पत्रकारांची दिवाळी….पुरुषोत्तम आवारे पाटील

0
17

 

दिवाळी झाल्यावर पत्रकारांची दिवाळी सुरू होत असते कारण दिवाळीच्या धामधुमीत हाडाचे पत्रकार जाहिरात रुपी जिन्नस मालकाच्या गोदामात भरण्यात व्यस्त असतात.हा कमीअधिक प्रमाणात सर्व स्तरातील पत्रकारांचा दिनक्रम असतो.ग्रामीण भागात काम करणारे पत्रकार अगदी धनतेरसच्या सायंकाळ पर्यंत जाहिरात गोळा करीत असतात. मालकांचा संपादक आणि संपादकांचा पत्रकारांवर या काळात जाहिरात साठी दबाव कायम असतो. हा व्यवसाय अलीकडे असा झालाय की माध्यमात काम करणारे सगळेच घटक तणावात असतात. टार्गेट, तणाव अन विविध प्रकारचे दबाव यातून सध्यातरी पत्रकारांची आझादी कुठे दिसत नाही.

यावर्षी पत्रकारांची दिवाळी बऱ्यापैकी गाजली ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गिफ्ट व्हावचर आणि भाजप नेते पराग शाह यांच्या एचएमव्ही मुळे. दिवाळीच्या काळात मुंबईत राजकीय पत्रकारिता करणाऱ्यांना म्हणजे मंत्रालय बिट कव्हर करणाऱ्या पत्रकारांना भेटवस्तू देणे ही जुनी प्रथा आहे. प्रत्येक दिवाळीत या बिटच्या पत्रकारांना किमान दोन तीन डझन वस्तू विविध मंत्री घरपोच पाठवून देत असतात. काही निवडक मंत्री मात्र बंगल्यावर दिवाळी मिलन ठेवून आदर सत्कार करीत असतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अशा कार्यक्रमांना गर्दी उसळते. अनेक अनपेक्षित पत्रकार तिथे प्रकट होतात. मामला पत्रकारांचा असल्याने यजमान पण दबून असतात.

यावर्षी फडणवीस यांनी पत्रकारांना 50 हजाराचे गिफ्ट व्हावचर दिले आणि त्या रांगेत स्वाभिमानवर तासनतास भाषण झोडणारे अनेक संपादक उपस्थित होते त्यामुळे सोशल मीडियावर बरीच टीका झाली. अर्थात ज्यांना निमंत्रण नसेल अशानीच त्यावर टीका केली असावी. खरा मुद्दा पराग शाह यांनी केलेल्या अनाठायी टीकेचा आहे.त्यांनी ट्विट करून पत्रकारांना एचएमव्ही म्हटले आहे. एचएमव्ही म्हणजे हीज मास्टर्स व्हाईस. गाण्यांच्या तबकड्या तयार करणारी ही कंपनी होती,त्यावर एका कुत्र्याचे छायाचित्र होते,तो कुत्रा म्हणजे आताचे पत्रकार असे या भाजप नेत्याला म्हणायचे आहे. कुणी विरोधात लिहिले किंवा आरसा दाखवला तर भाजप नेते किती खालच्या पातळीवर उतरू शकतात याचा हा नमुना म्हटला पाहिजे,या प्रवृत्तीचा निषेध आहेच.

प्रामाणिक हेतूने पत्रकारांना कुत्रा म्हटले तर त्यात वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही कारण खरा पत्रकार नेहमीच स्वतःला लोकशाही मूल्यांवरील वाचडॉग म्हणवून घेत असतो. टिळक असोत की रामनाथ गोयंका यांनीही स्वतःला वाचडॉग म्हणवून घेताना कधी कमीपणा घेतला नाही. इथे मात्र भाजप नेत्यांचा हेतू प्रामाणिक वाटत नाही. अर्थात तटस्थ पत्रकारांना त्याचेही वाईट वाटत नाही,मात्र गेल्या काही वर्षात तटस्थ पत्रकारिता इतिहासजमा झालीआहे.सुपारी,अजेंडा,पाकीट आणि पेड असे पत्रकारितेचे विभाग तयार झाले आहेत. पत्रकार सुद्धा समाजाचा घटक आहे,ते काही परग्रहावरील प्राणी नाहीत त्यामुळे समाजाचे गुणदोष घेऊनच ते काम करीत असतात याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

पत्रकारांची दिवाळी किंवा भेटवस्तू हा काही फार मोठया चर्चेचा विषय होण्याची गरज नव्हती,कधीतरी वर्षातून एकदा त्याला कुणी भेट देते त्याची चर्चा होते आणि आमदार ,मंत्री नेते घश्यात काय काय टाकत असतात त्याची हवाही कुणाला लागत नाही,अधिकारी सुमडीत एखादा फ्लॅट गिळतात याचाही कुणाला पत्ता लागत नाही. पत्रकारांची दिवाळी सरसकट आनंदाची नसते हे वास्तव आहे. अपवादात्मक पत्रकार नजर लागावी अशी दिवाळी साजरी करतात मात्र बहुतांश ठिकाणी अंधार असतो ही वस्तुस्थिती आहे. दिवाळी चार दिवसांवर आली अशा दिवसात नेतेही पत्रकारांचे कॉल घेत नाहीत.जाहिरात मागण्याची भीती असते.एरवी वर्षभर हाच पत्रकार त्याच्या दैनिकांत नेत्यांना लाखो रुपयांची जागा फुकटात बातमी रूपाने देत असतो हे नेते मात्र त्याची कृतज्ञता म्हणून चार पाच हजारांची जाहिरात देताना साऱ्या जगाची कडकी कथन करीत असतात,काही नेते तर आपण पेन्शनर असल्याचे रडगाणे सांगत असतात.

___ पुरुषोत्तम आवारे पाटील

संवाद-9892162248